पुरंदर विमानतळ प्रकल्प (फोटो- istockphoto)
पुरंदर एअरपोर्ट महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प
देवेंद्र फडणवीस – शेतकरी यांच्यात होणार बैठक
बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष
सासवड/संभाजी महामुनी: पुरंदर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी असलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा टप्पा असलेल्या “परतावा” बाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतकऱ्यांची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मंगळवारी बैठक पार पडणार असून प्रकल्पबाधित सातही गावातील प्रत्येकी पाच प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना जागेच्या बदल्यात दिला जाणारा मोबदला आणि इतर महत्वाच्या गोष्टीबाबत चर्चा होणार आहे. हि बैठक अत्यंत महत्वाची असणार असून बैठकीतील होणाऱ्या निर्णयाकडे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. सुरुवातीला सात गावांमधील २८३२ हेक्टर क्षेत्रावरील सातबारा उतारावर विमानतळ प्रकल्पासाठी असे शेरे मारले होते. परंतु प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता शासनाने क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२८५ हेक्टर म्हणजे तीन हजार एकर क्षेत्रावर विमानतळ प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून पहिल्या टप्प्यात ३००० एकर क्षेत्र संपादित करण्याचे जाहीर केले.
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटींचा खर्च; मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना भेटणार
२५ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या काळात संमतीपत्र स्वीकारण्याची मुदत जाहीर करून जवळपास ९४ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली. त्यानंतर लगेचच शुक्रवार दि.२६ सप्टेंबर ते २० ऑक्टोंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जमीन मोजणीस सुरुवात करण्यात आली. यामध्ये जमिनीच्या जागेबरोबरच घरांचा, जनावरांचा अशा सर्व प्रकारचा सर्व्हे करण्यात आला. कृषी विभागाकडून शेतीच्या संबंधित झाडे, फळबागा, पाईप लाईन, विहिरी, तळे आदींचा सर्व्हे, भूमी अभिलेख विभागाकडून घर आणि जमिनीच्या जागेचे क्षेत्रफळ नक्की करणेअशा गोष्टींची माहिती संकलित करण्यात आली आहे.
विमानतळ प्रकल्पासाठी गावनिहाय भूसंपादन होणारे क्षेत्र पुढील प्रमाणे आहे. ,,,,
एखतपुर २०१ हेक्टर, खानवडी २६६ हेक्टर, कुंभारवळण २५५ हेक्टर, मुंजवडी ७७ हेक्टर, पारगाव १८८ हेक्टर, उदाचीवाडी ४५ हेक्टर आणि वनपुरी १७५ हेक्टर याप्रमाणे एकूण तीन हजार एकर ( १२८५ हेक्टर ) याप्रमाणे क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.
दरम्यान मागील पंधरवड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी भूसंपादन अधिकारी व प्रकल्प बाधित गावातील शेतकऱ्यांची दोन वेळा बैठक पार पडली असून शेतकऱ्यांकडून अपेक्षा काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणायत आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेण्याचे जाहीर करून प्रत्येक गावातून प्रत्येकी पाच शेतकरी प्रतिनिधी निवडावेत असे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी दुडी यांच्या सुचनेनंतर गावोगावी शेतकऱ्यांनी बैठका घेत सर्वसमावेशक अशा पाच प्रतिनिधींची निवड करण्यात आली. मागील आठवड्यात मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. मात्र त्याच दरम्यान मुख्यमंत्री पुण्यात येणार असल्याने बैठक रद्द करण्यात आली.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी महत्वाची आणि निर्णायक बैठक पार पडत असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, उद्योगमंत्री, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, एमआयडीसीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, प्रकल्पबाधित गावांचे शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट; भूसंपादन दरनिश्चितीसाठी ‘या’ तारखेला होणार बैठक
दरम्यान विमानतळ प्रकल्पासाठी कायमस्वरूपी जमीन जाणार असल्याने एकरी सात ते आठ कोटी रुपयांची मागणी शेतकऱ्यांनी यापूर्वीच केली आहे. त्या सोबतच प्रत्येक कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तींना शासकीय नोकरी, विविध व्यवसायांचे प्रशिक्षक, जमिनीच्या मोबदल्यात २५ टक्के परतावा, प्रकल्प बाधित गावातच पुनर्वसन, बेघर होणाऱ्या शेतकऱ्यांना घरासाठी किमान पाच ते दहा गुंठे जमीन यांसह इतर मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत काय चर्चा होणार ? मुख्यमंत्री कोणत्या मागण्या पूर्ण करणार ? आणि शेतकऱ्यांचे समाधान करणार का ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






