सौजन्य - नवराष्ट्र टीम
उपरोधिक, निनावी फलक किंवा पोस्टर किंवा पॅम्प्लेट या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा पक्षाची खिल्ली उडवणे, भांडाफोड करणे असे तंत्र काही उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते अवलंबत असतात. तत्कालीन खासदार विठ्ठलराव गाडगीळ हे अनेक महिने पुण्यात नसत. ते दिल्लीतच मुक्कामी असत. एका लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर अप्पा बळवंत चौकात त्यांच्या पुण्याकडील दुर्लक्षाबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या निनावी फलकाची चर्चा रंगली होती. काही वर्तमानपत्रांनीही या फलकाची सचित्र दखल घेतली होती.
महापालिकेच्या निवडणुकीत रंगत निर्माण
महापालिका निवडणुकीत असो की लोकसभा निवडणुकीत ‘लक्ष्मी दर्शन’ विशिष्ट मतदारांना घडवले जाते. प्रत्येक निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप किंवा कुजबूज होत असते. यंदाच्या मनपा निवडणुकीपूर्वी जंगली महाराज रस्त्यावर ‘दाराला नीट कडी लावा रात्री, हाकामारी येणार आहे’ अशे पोस्टर झळकावण्यात आली आहेत. त्यामागील अपरात्री होणारे पैसे वाटप हा अर्थ समजून जाणकारांमध्ये स्मित उमटत आहे. हे पोस्टर कोणाला उद्देशून आहे याची जाणीव सुद्धा होत आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा त्याचा पक्ष यांची दुखरी नस पकडून निनावी पोस्टर, पत्रके किंवा फलक झळकावण्यास सुरुवात झाल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत निर्माण होत आहे.






