पुणे : आर्थिक चणचण भासत असल्याने थेट मंदीरातील घंटा चोरून पसार झालेल्या रिक्षा चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याने भैरवनाथ मंदिरातून पितळी घंटा चोरली होती. सोहेल इलियास शेख (वय २५, रा. वडत्तरवाडी, गोलंदाज चौक, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल हिरवे, सुहास मारे, राहुल थोरात, गणेश चिंचकर, राहुल रासगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोंढवा परिसरातील भैरवनाथ मंदीरातून पितळी घंटा चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीच्या गुन्ह्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संताष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदिप भोसले यांनी सुचना दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. सीसीटिव्हीमध्ये त्यांना रिक्षा चालक मंदीरातील घंटा चोरी करून नेत असल्याचे दिसले.
रिक्षाच्या नंबर वरून आरोपीचा शोध घेतला असता ही रिक्षा सोहेल शेखची असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेवुन चोरीबाबत विचारणा केली असता त्याने चोरी केल्याची कबूली दिली. अधिक तपासात त्याने आर्थिक अडचण असल्याने चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान त्याने डिक्कीत लपवून ठेवलेली घंटा पोलिसांना काढून दिली.