संग्रहित फोटो
बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : लेकीकडे आल्यानंतर बारामती शहरातील नीरा डावा कालव्याच्या कडेने मॉर्निंग वॉक (Morning Walk) करत असताना महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बारामती शहरात घडली. सरस्वती गुणवंत तोंडारे (वय ६७, रा. भिगवण, ता. इंदापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तोंडारे या आपल्या मुलीकडे राहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील ओझर्डे ईस्टेट याठिकाणी आल्या होत्या. गुरुवारी (दि.९) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी त्या नीरा डावा कालव्यावर गेल्या होत्या. वॉकिंग करत असताना कालव्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
संबंधित महिलेचे पती हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असून, ते भिगवण या ठिकाणी स्थायिक आहेत. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार करे हे करत आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी : पोलिस निरीक्षक
महिलेचा मृतदेह बारामती शहरातील कालव्याच्या पुलाजवळ लोकांनी पाहिला, पोलिसांनी तत्काळ बीट मार्शल ठोंबरे व मनोज पवार यांनी जनतेचे सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला. कालव्यात पोहताना ज्याला पोहता येते, त्यांनी काळजी घ्यावी, कारण अंग कोरडे असताना कालव्यात पोहण्यास गेल्यानंतर कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण झाल्याने अंग ओले झाल्यानंतर वर चढता येत नाही. एखाद्याला बाहेर काढणे देखील जिकरीचे होते. नंतर प्रवाहात अडकला की दम लागतो आणि त्यातून गटांगळ्या बसून अनूचित प्रकार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.