पैठण : पैठण शहरातील बाहेरील नाथ मंदिर परिसरातील व्यापारी गाळा रिकामा करण्याच्या कारणावरून सहा जणांनी पानफुल विक्रेत्या महिलेसह तिच्या मुलीला मारहाण केली. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दीडच्या सुमारास नाथ नाथमंदिर परिसरात या दोघांमध्ये गाळा रिकामा करण्यावरून वाद झाला. याबाबत संगीता विश्वनाथ जाधव यांनी ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये योगेश अंबरसिंग परदेशी, चांदणी योगेश परदेशी, पप्पू परदेशी, कृणाल परदेशी, तेजश्री परदेशी, रितेश परदेशी या सहा जणांनी फिर्यादीला गाळा रिकामा करण्याच्या मुद्द्यावरून वाद घालून मारहाण केली. त्यामुळे या सहा जणांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जिवढे हे करत आहेत.
दरम्यान, नाथषष्ठी जवळ आली असून, त्यादृष्टीने नगरपरिषद प्रशासन कामाला लागले आहे. नाथषष्ठी कालावधीत जिल्ह्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, यात्रामहोत्सव लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केल्याचे संजय देशमुख यांनी सांगितले.