लोणावळा : लोणावळ्याजवळील कुरवंडे येथील ड्युक्सनोज (नागफणी) येथे फिरायला गेलेला दिल्ली येथील एक तरूण शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाला. याबाबत बेपत्ता असलेल्या तरुणाने त्याच्या भावाच्या मोबाईलवर मेसेज करुन माहिती दिली आहे.
मेसेजनंतर सदर तरूणाचा मोबाईल बंद दर्शवित आहे. इरफान शहा (वय-२४, रा.दिल्ली) हा तरुण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. लोणावळा शहर पोलिस, श्वानपथक पथक, लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र व खोपोलीतील यशवंती हायकर्स ही दोन आपत्कालीन पथके ही ड्रोन कॅमेरेच्या सहाय्याने सदर तरुणाचा शोध घेत आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील इरफान शहा हा तरुण शुक्रवारी लोणावळ्यात एकटाच मी फिरायला आला होता. शुक्रवारी दुपारी तो लोणावळ्या जवळील ड्युक्सनोज (नागफणी) येथे फिरायला गेला होता. फिरताना तो ड्युक्सनोज परिसरातील जंगलात भरकटला. इरफानला आपण भरकटला असल्याची खात्री झाल्यावर त्याने या घटनेबाबत त्याच्या भावाला मेसेज करून माहिती दिली.
माहिती दिल्यानंतर इरफानचा मोबाईल बंद दर्शवित आहे. माहिती मिळाल्यानंतर इरफानच्या भावाने त्याच्या मित्राच्या मदतीने लोणावळा शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील व लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांनी याबाबत लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र व खोपोलीतील यशवंती हायकर्स तसेच श्वान पथकाशी संपर्क साधून शोध मोहिमेसाठी प्राचारण केले. रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली आहे.