भोर तालुक्यातील वेळूत भीषण अपघात; दोन तरुणांचा मृत्यू, एकजण जखमी (Accident Photo)
भोर : पुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता.भोर) येथे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अचानक विरुद्ध दिशेच्या लेनवर घुसून अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर तिघांना गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. याबाबत गोरक्षनाथ बाबासाहेब खुटवड (वय ४९ रा.उंबरे ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गोरक्षनाथ खुटवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रक चालक मेहताब अलो दफादार (वय ४६ रा.पश्चिम बंगाल) याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खुटवड हे नेहमीप्रमाणे आपल्या कामासाठी त्यांच्या दुचाकीहून (एमएच.१२ एमवाय १४५५) जात असताना वेळू गावच्या हद्दीतील डब्ल्यू.ओ.एम. कंपनीसमोर पुण्याकडून साताऱ्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (एम.एच.०४ के.यु.११४४) ने विरुद्ध लेनमध्ये घुसून फिर्यादींच्या दुचाकीसह कंटेनर (के.ए.५१ ए.के.६११९), पिकअप (एम.एच.१२ जे.एफ.५२८८) आणि दोन दुचाकींना (एम.एच.१० डी.एक्स. ५६९४, एम.एच. १० बी.बी.३९९९) धडक दिली.
हेदेखील वाचा : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला त्रास; छळ हिंगोलीत पण तक्रार पश्चिम बंगालमध्ये, जाणून घ्या प्रकरण नेमकं काय?
यामध्ये ट्रकने दोन दुचाकीस्वारांना फरफटत नेले आणि त्यानंतर ट्रक पलटी झाला. अपघातग्रस्तांना तात्काळ डब्ल्यू.ओ.एम. कंपनीच्या रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु, या भीषण अपघातात प्रथमेश महादेव रेडेकर (वय ३२, रा. सांगली) व दिव्यम सुनिल निकम (वय ३१, रा. धुळे) या दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर पिकअप चालक संजय श्रीरंग खाटपे (वय ४२, रा. हिरडस मावळ) यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाली असून, त्यांच्यावर भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचार सुरू आहेत. या घटनेबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गडचिरोलीतही भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली मार्गावर निजाम पेंदाम व मनोज मुजुमदार यांच्या घरासमोरच अचानक ट्रक पलटी झाला. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या अशा अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हेदेखील वाचा : Solapur Crime: भेटवस्तू अन् महागड्या हॉटेलमध्ये…, आशा सेविकांकडून गर्भवती महिलांची दिशाभूल; नेमकं प्रकरण काय?