खंडाळा : खांबाटकी घाटातील भैरवनाथ मंदीराजवळ ट्रेलरची पीन निसटल्याने केबीन व ट्रेलर वेगळा झाला. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही .
याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की,गुजरातहुन बेंगलोरकडे 20 टन वजनाच्या केबलचे रोल घेऊन ट्रेलर निघाला होता . बुधवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास खांबाटकी घाट चढत असताना भैरवनाथ मंदीराजवळील अवघड तीन वळणे पार करून ट्रेलर पुढे निघाला होता . सपाट व सरळ असणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मधल्या लेनवरून ट्रेलर पुढे जात असताना अचानकपणे ट्रेलर व केबीन तुटून वेगळे झाले . ट्रेलर तुटून खाली पडला.त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहतुक सुरळीत सुरु होती .
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतुक शाखेचे सपोनि हर्षद गालिंदे , पोलीस हवालदार निलेश गायकवाड,रविंद्र वाघमारे,अतुल आवळे,सर्जेराव कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले . क्रेनच्या साहाय्याने ट्रेलर बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली.