नाशिकमध्ये व्हायरल व्हिडिओमधील बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा व्यक्ती नाही (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. डिसेंबर महिन्यामध्ये बीडचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला प्रमुख आरोपी म्हणून तर त्यांचे निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आहे. बीड हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झाली असली तरी एक आरोपी फरार आहे. याबाबत एक मोठी अपडेट सुरु झाली आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये बीड हत्या प्रकरण झाले असून अद्याप एक आरोपीला अटक झालेली नाही. कृष्णा आंधळे असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस यंत्रणेला अद्याप तो सापडलेला नाही. कृष्णा आंधळे याला फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून तो सापडत नसल्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला होता. मात्र कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याचा दावा करण्यात होता. याचे नाशिक पोलिसांनी तपास करुन खंडन केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नेमकं प्रकरण काय?
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा मोठा दावा वकील गितेश बनकर यांनी केला आहे. गितेश बनकर म्हणाले की, “सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मी दत्त मंदिराजवळ गेलो. तिथे झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांपैकी एकाने मास्क खाली केला आणि मला चेहरा स्पष्ट दिसला. तो 100% कृष्णा आंधळेच होता. मी त्वरित गंगापूर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. त्यानंतर ते दोघे मखमलाबादच्या दिशेने निघून गेले. वकील म्हणून 18 वर्षांचा अनुभव असल्याने गुन्हेगारांना ओळखण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये कृष्णा आंधळे हा मोक्कार फिरत असल्याचा आरोप केल्यामुळे पोलीस यंत्रणा देखील जोरदार कामाला लागली. स्थानिक नागरिकांनी दुचाकीवरून कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. गंगापूर पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच कृष्णा आंधळे हा किती वाजता आला, किती वेळ थांबला आणि कुठे गेला याचा तपास नाशिक पोलिसांनी केला. मात्र हा कृष्णा आंधळे नसल्याचे नाशिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला असल्याच्या आरोपामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली, पोलिसांनी पूर्ण तपास केला असून हा व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आरोपी कृष्णा आंधळे हा सापडत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.