वणी : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत वणीच्या आकांक्षा मिलिंद तामगाडगे (Akanksha Tamgadge) हिने यूपीएससी परीक्षेत ५६२ वा क्रमांक पटकावला आहे. आकांक्षा हिने आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथून पूर्ण केले. आई माधुरी व वडील मिलिंद तामगाडगे हे दोघेही डॉक्टर आहेत. त्यामुळे अकांक्षाने सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. परंतु, तिने खचून न जाता आपले अविरत परिश्रम सुरु ठेवले. मात्र, आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या आकांक्षा (Akanksha) हिने पुन्हा जोमाने तयारी केली. कोरोना कालखंडात संपूर्ण शिक्षणव्यवस्था ढासळली असूनही तिने न डगमगता घरुनच ऑनलाईन अभ्यास सुरु ठेवला. आणि तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आकांक्षाच्या घरात वैद्यकीय शिक्षणाचे वारे वाहत असताना तिने या क्षेत्रात यशाला गवसणी घातली आहे. तिच्या एका बहिणीनेही वैद्यकीय शिक्षक पूर्ण केले आहे. तर, आकांक्षा हिचा लहान भाऊ हर्ष तामगाडगे हा बारावीत शिकत आहे. आकांक्षाच्या यशाबद्दल कुटुंबासह शहरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






