राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु आहे. त्यातच आता निवडणुकीच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याआधीच्या निवडणुकीवेळी अनेक अधिकारी किंवा कर्मचारी फिजिकल प्रेझेंट राहत होते. तर अनेकजण फक्त सही करून घरी जात होते. मात्र यावेळी निवडणुकीचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना प्रशिक्षणावर आधारित २५ प्रश्नांची बहुपर्यायी प्रश्नपत्रिका उपस्थित प्रशिक्षणार्थी कर्मचारी अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अधिकाऱ्यांसाठी विशेष महत्वाची ठरणार आहे.
प्रशिक्षणासाठी गैरहजर असलेल्या ८५ अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. या अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. १३ मे ला जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना चाळीसगावमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाला ८५ अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जळगावमध्ये १३ मे ला मतदान होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणुक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांना घेण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षणाची जबाबदारी निवडणुक नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांना देण्यात आली आहे.
निवासी नायब तहसीलदार, जितेंद्र धनराळे, महसूल नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, संगायो नायव तहसीलदार भानुदास शिंदे या सर्व अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली जळगाव मधील लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना दोन सत्रामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सकाळी पहिल्या सत्रात ४३० तर दुसऱ्या सत्रात ८८० आणि इतर अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच त्यांची बहुपर्यायी चाचणी देखील घेतली जाणार आहे.
मतदान केंद्रावर नियुक्ती केलेले अधिकारी आणि कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये म्ह्णून टपाली मतपत्रिका मिळण्याचा फॉर्म व निवडणुक कार्य प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांपैकी ८५ अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर राहिले आहेत. त्यांना नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.