Maharashtra Politics : पालकमंत्रिपदावरून आदिती तटकरे म्हणाल्या, 'नाशिकमुळे रायगडच्या...' (फोटो- सोशल मिडिया)
नाशिक : रायगडमुळे नाशिकचे पालकमंत्रिपद लटकले, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ‘मीही असे म्हणू शकते’, असे उत्तर देत एकप्रकारे नाशिकमुळेच रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले. हा प्रश्न पद्धतशीरपणे टोलवून लावताना विकासाआड कोणीही येऊ नये, हे सांगायलाही त्या विसारल्या नाहीत.
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींनी भविष्यात एकत्र यायचं की नाही, हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवायचे आहे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे, असेही ते म्हणाले.
‘आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत’, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. याविषयी मंत्री तटकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मी काही यावर अधिक बोलू शकत नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यावर भाष्य करणे उचित नाही’.