warali hit and run
मुंबई : पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आता मुंबईतही हिट अँड रनची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील वरळीतील मासळी बाजारात मासे आणण्यासाठी निघालेल्या एका कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाचच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन फरार आहे. वरळी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य आज पहाटे साडेपाचच्या सुमारास माशांच्या घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे असल्याने महिलेच्या पतीचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. महिलेच्या पतीने बोनेटवरुन बाजूला उडी मारली. पण महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही.
पण अचानक झालेल्या या प्रकारामुळे चारचाकी वाहनचालक चांगलाच घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. यात त्याने बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेलाही फरफटत नेले. या अपघातात पती बचावले मात्र महिलेल्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. चारचाकी खाली आल्याने महिलेचा चिरडून मृत्यू झाला. पण या प्रकारानंतर चारचाकीचा मालक फरार आहे. वरळी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.