अमरावती : कृषी विभागाच्या (Agricultural Department) ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा प्रारंभ अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agricultural Minister Abdul Sattar) यांच्या उपस्थितीत झाला आहे. कृषीमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या का करतो याची कारणे शोधण्यासाठी आलोय,काही नवीन धोरणात्मक नियम करता येतील का याबाबत चाचपणी करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. मेळघाटासह इतर भागात १०० टक्के नुकसानाचे पंचनामे झाले, असा दावा कृषी मंत्री सत्तार यांनी केला.
साद्राबाडी गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे अब्दुल सत्तार रात्री मुक्कामी राहिले. रात्रीचे जेवण सुद्धा कृषीमंत्री सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या घरीच केले. साद्राबाडी या गावातील शेतकऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांच औक्षण देखील केले.आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
कृषीमंत्र्यांचा कार्यक्रम
कृषीमंत्री सत्तार हे आज सकाळी ९ वाजता दत्तात्रय पटेल यांच्यासोबत शेतात जातील. तिथे सोयाबीन फवारणी नंतर ते पटेल यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर बाजूलाच असलेल्या राजेश डावलकर यांच्या शेतात कापूस डवरणी/फवारणी होईल. नंतर बाबूलाल जावरकर यांच्या शेतात विद्युत पंप दिले आहेत. त्याची पाहणी होईल आणि सोयाबीन फवारणी होईल. तिथून ते किशोरीलाल धांडे यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या संत्रा बागेची पाहणी करतील. संत्र्याची छाटणी, खत देणे, फवारणी होऊ शकते. त्यानंतर नंदलाल बेठेकर यांच्या विहीरीची पाहणी होणार आहे. तिथून अशोक पटेल यांच्या शेतात ठिंबक संच पाहणी करणार आणि रामगोपाल भिलावेकर यांच्या शेतात तुषार संच पाहणी. मग बाटु धांडे यांच्या शेतात रोटावेटरची पाहणी आणि नथु गाडगे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील आणि मग पुरुष बचत गटाच्या अवजार बँकेची पाहणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार करणार आहेत.