मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. या योजनेत काही बदल करणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. ‘आम्ही या योजनेत काही दुरूस्ती करणार आहोत, पण योजना बंद करणार नाही’, तसंच लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, त्यांच्याकडून पैसे घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरली. लाडकी बहीण योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. वित्तमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो, त्यावेळी या योजनेमधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो’. ‘१५०० रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने उचललं आहे. विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी परवाच एक घोषणा केली होती, ती घोषणा माझ्या वाचनात आली आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंत कर्ज देणार आहे’.
‘राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे. जिल्हा सहकारी बँका आहेत. तसेच सहकारी बँकाही आहेत. ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू’, असं अजित पवार म्हणालेत. ‘कारण सुमारे ४५ हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून बहीण सक्षम होऊन तिच्या कुटुंबालाही हातभार लावेल, हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल’, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
लाडक्या बहिण संदर्भात आम्हाला आपुलकी आहे. पण, काहींची गांडूळासाखी अवस्था आहे, ते कोणत्या तोंडाने चालतं हे कळत नाही. पाच वर्षाचा वचननामा असतो, तो आम्ही देणार आहोत. तुम्ही तर कोर्टात गेले होते, तुम्ही तर चुनावी जुमला म्हणाले. आम्ही दोन शासन निर्णय काढले. लाडक्या बहिणींचे वय 60 ऐवजी 65 केले. घाईगडबडीत काही भगिनींची अर्थिक परिस्थिती चांगली आहे, पंतप्रधान यांनी ही गॅस संदर्भात आवाहन केल्यानंतर लोकांनी परत केले होते, असे उदाहरण अजित पवारांनी दिले. तसेच, लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.