फोटो - टीम नवराष्ट्र
बुलढाणा : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्याचे राजकारण तापले आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेची तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीवेळी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध नणंद सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत झाली होती. मात्र आता ही अशी लढत नव्हती व्हायला पाहिजे. बहीणीविरुद्ध उमेदवार नव्हता द्यायला पाहिजे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देत देर आये दुरुस्त आये अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच विधानसभेवेळी महाविकास आघाडीमध्ये काय रणनीती आखण्यात येईल याबाबत विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांना कानपिचक्या दिल्या आहेत. वडेट्टीवार म्हणाले, “भाजपा घर फोडण्यात पक्ष फोडण्यात वस्ताद आहे. भाजपाला घर उध्वस्त होताना आसुरी आनंद होतो. घर फोडणे कुटुंबात लढवणे हे त्यांचे धंदे आहेत. इंग्रजांची निती आणि त्यांच्या नितीत फरक नाही. अजित पवार हे मजबुरीने गेले असावेत त्यामुळे त्यांना पश्चाताप होत असेल. पण ‘देर आये दुरुस्त आये” अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.
पुढे त्यांनी राज्य सरकावर लाडकी बहीण योजनेवरुन हल्लाबोल केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला जाब विचारला आहे. यावरुन वडेट्टीवार म्हणाले, “कोणत्याही योजनेला पैसे देण्यासाठी तिजोरीत पैसे नाहीत. अनेक योजना कात्री देऊन पैसे दिल्या जात आहेत. हे सगळं मतासाठी केलं जातं आहे. सर्व विभागाला कात्री लावली जातीये. इतिहासात कोरोनामध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांचा 70 टक्के पगार दिला नव्हता. सनदी अधिकाऱ्यांना दोन ठिकाणी पेन्शन साठी अर्ज करण्याचा अधिकार आहे. पण पहिल्यांदाच असे झाले की महाराष्ट्रात अर्ज केला त्यांनी सचिव निवृत्त झाल्यावर राज्याची स्थिती पाहून केंद्राकडे अर्ज केला. यावरून दयनीय अवस्था दिसते आहे,” असा टोला वडेट्टीवार यांनी केला.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्याबाबत आग्रही आहेत. तर महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेत आहेत यावर दिसून येतं आहे की सरकार घाबरून आहे. त्यांना वाटते की दोन चार हप्ते खात्यात टाकले तर बहिण आम्हाला विसरुन जाईल आणि त्यांना मत देईल. त्या भरोशवर आम्ही निवडणुका जिंकू असा यांचा समज आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्याचा त्यांचा डाव आहे. महाविकास आघाडीमध्ये एकत्र बसल्यावर मुख्यमंत्रीपद आणि जागावाटप यावर निर्णय होईल. आघाडीने जास्तीत जास्त जागा लढव्यात, अशी स्थिती आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत देखील आम्ही एकत्र बसू, जो निर्णय होईल तो जनतेसमोर ठेऊ. तोपर्यंत कुठलीही चर्चा किंवा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे यावर बोलण्याची गरज नाही,” असे स्पष्ट मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.