जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी मावळमध्ये एनसीपी उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या आहे (फोटो - सोशल मीडिया)
वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुक्यात (Maval News) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तीन दिवसांच्या शासकीय शोककाळानंतर उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला नव्याने गती दिली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी एकूण १३ उमेदवार, तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Political News)
जिल्हा परिषदेत चुरशीच्या लढती
मावळ तालुक्यातील इंदोरी–वराळे गट, खडकाळा–कार्ला गट, तसेच सोमाटणे–चांदखेड गट या तीन गटांमध्ये जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात सरळ दुरंगी लढत होत आहे. तर टाकवे बुद्रुक–नाणे गटात तिरंगी, आणि कुसगाव बुद्रुक गटात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.
पंचायत समिती गणातील चित्र
पंचायत समिती गणांमध्येही लढती रंगतदार झाल्या आहेत. वराळे, काले आणि चांदखेड गणांमध्ये दुरंगी सामना, तर टाकवे बुद्रुक, नाणे, इंदोरी, खडकाळा, कार्ला, कुसगाव बुद्रुक आणि सोमाटणे गणांमध्ये तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे प्रत्येक गणात कोण विजयी ठरणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : संसदेत राडा! विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित; नेमकं झालं काय?
प्रचार पद्धतीत बदल
निवडणूक प्रचारात यंदा ढोल-ताशे, माईक-स्पीकर, फटाके यासारख्या भडक प्रकारांना उमेदवारांनी जाणीवपूर्वक टाळले आहे. त्याऐवजी घराघरांत जाऊन मतदारांच्या गाठीभेटी, थेट संवाद, तसेच परिचय पत्रिका वाटप या पद्धतींवर भर दिला जात आहे. ग्रामीण भागात सोशल मीडियाचा प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असून, व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांतून उमेदवार आपला प्रचार प्रभावीपणे करत आहेत.
शोककाळामुळे प्रचार थांबला
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लोकनेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. ही घटना अतिशय दुःखद असल्याने शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखावला जाहीर केला होता. या काळात सर्व राजकीय सभा, प्रचार कार्यक्रम, जाहीर मिरवणुका रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मावळ तालुक्यातील निवडणूक वातावरण काही काळ पूर्णपणे शांत झाले होते.
निवडणूक तारखांमध्ये बदल
शोककाळामुळे निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता ७ तारखेला मतदान तर ९ तारखेला मतमोजणी होणार आहे. प्रचारासाठी दोन दिवस अधिक मिळाल्याने उमेदवारांनी पुन्हा जोमाने प्रचार सुरू केला असून, शेवटच्या टप्प्यात मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर अधिक भर दिला जात आहे. मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून, शोककाळानंतर आता प्रचाराची दिशा बदलली आहे. भव्य सभा टाळून शांत, थेट आणि वैयक्तिक संवादावर आधारित प्रचार हे यंदाच्या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत आहे.
राजकीय समीकरणे तापली, पक्षांतर्गत हालचालींना वेग
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही प्रभावीपणे मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच स्थानिक आघाड्या यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणाचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न स्थानिक नेते करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी सहानुभूतीचा मुद्दा पुढे करत मतदारांना भावनिक साद घातली जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून विकास, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, रोजगार या मुद्द्यांवर आधारित प्रचारावर भर दिला जात आहे.
हे देखील वाचा : गड्या आता जावं लागतंय! बाली, थायलंड सोडा अन् स्वर्गात या; ‘हा’ जिल्हा Tourism मध्ये…
अपक्षांचा फॅक्टर ठरणार निर्णायक
यंदाच्या निवडणुकीत अनेक गट व गणांमध्ये अपक्ष उमेदवार प्रभावी भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कुसगाव बुद्रुक गटातील चौरंगी लढतीत अपक्ष उमेदवारांमुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार हे थेट स्थानिक प्रश्नांवर प्रचार करत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेवटच्या टप्प्यात गुप्त भेटीगाठी
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पक्षनेते व उमेदवारांमध्ये गुप्त भेटीगाठींना वेग आला असून, मतदारसंघातील प्रभावी व्यक्ती, संस्थाध्यक्ष, महिला बचत गट, युवक मंडळे यांच्याशी स्वतंत्र बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये काही ठिकाणी मतदारांचे ध्रुवीकरण रोखण्यासाठी सामंजस्याचे प्रयत्नही सुरू असल्याची चर्चा सुरु आहे.






