मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी पुण्यातील कार्यक्रमामध्ये समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गुरु असल्याचे म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेचा तीव्र विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. भाजप (BJP) नेते असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्यावर राष्ट्रवादीने टीकास्त्र डागले. मात्र भाजपसोबत युती केलेल्या अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याला विरोध दर्शवला आहे. भाजपसोबत युती केलेल्या अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेला विरोध दर्शवत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांची जडणघडण केली आहे. अशी ठाम भूमिका अजित पवार यांनी घेतली. भाजपचे लोकप्रिय नेते योगी आदित्यनाथ यांच्या भूमिकेचे खंडन करुन अजित पवार हे आपल्या मतांशी ठाम राहिले आहेत. शरद पवार यांनी घेतलेली भूमिका अजित पवार यांनी देखील घेतली. अजित पवार भाजप सोबत गेल्यामुळे ते योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याची पाठराखण करतील असे राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात होते. मात्र अजित पवार यांनी आपल्या मतांशी ठाम राहून भाजप नेत्यांना विरोध दर्शवला आहे.
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ ?
“मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचं भाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलो आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीपुढे मी नतमस्तक आहे. अगदी लहान होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे,” अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपले मत व्यक्त केले होते.






