अजित पवार(फोटो-सोशल मीडिया)
सातारा : ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाच्या जतन व संवर्धनासाठी शासनाने ५२ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखून, ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ८५ व्या औंध संगीत महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील,पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, संस्थेचे सचिव अरुण कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर, उल्हास कशाळकर, प्रभाकर घार्गे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्थान म्हणून ओळखले जाते. संगीत, साहित्य, नाट्य, चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांनी राजाश्रय दिला. त्या काळातील दूरदृष्टी ही अत्यंत महत्त्वाची होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साताऱ्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात येणाऱ्या असुविधा सोडविण्यासाठी प्रयत्न करायचा हा त्यांचा विचार घेऊन शासन काम करत आहे, असे सांगून भविष्यात शिवानंद प्रतिष्ठानला संगीत सेवा निरंतर चालू ठेवण्यासाठी निवासी गुरुकुल निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा पुरवून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, औंधचे तत्कालीन राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी अतिशय दूरदृष्टीचे शासक आणि प्रशासक होते. अप्रतिम असे वस्तुसंग्रहालय त्यांनी तयार केले. त्या वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून नूतनीकरण करण्यात येईल. पर्यटनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यावर शासनाचा भर आहे. ज्याप्रमाणे आपल्या तत्कालीन राजांनी कला, संस्कृती आणि मानवतेचे पुरस्कर्ते म्हणून काम केले त्याप्रमाणे शासन काम करत आहे. राजा हा प्रजेचा मायबाप मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रचला. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यातून त्यांनी रयतेचे राज्य ही संकल्पना वास्तवात उतरवली. त्याच परंपरेचा वारसा औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुढे नेला.
हेही वाचा : MHADA lottery: म्हाडा कोकण मंडळाची सोडत संपन्न; एकनाथ शिंदे म्हणाले, ” ज्यांना घराची लॉटरी लागली…”
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १० वर्षे आधी पंतप्रतिनिधींनी औंध संस्थानची सत्ता जनतेच्या हातात देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या संस्थानने लोकांना स्वतःचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला, असे सांगून शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था संस्कृतीचा दीपस्तंभ आहे या प्रतिष्ठान मुळे नवीन मंच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील स्वरांची जपणूक होत आहे त्यांच्या कार्याला सर्व ती मदत करण्यात येईल, तसेच औंधच्या क्रीडांगणाला स्टेडियमचे स्वरुप देण्यात येणार आहे, त्यासाठी औंधकरांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण कशाळकर यांनी केले. संगीत महोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम होत असल्याचे सांगून निवासी गुरुकुल उभारण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी विनंती केली. व कला मंदिराच्या अद्ययावतीकरणासाठी करण्यात आलेल्या मदतीबद्दल आभार मानले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या ‘रियाज’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते