'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती (Photo Credit- Social Media)
बारामती / अमोल तोरणे : संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली. त्यानंतर सुरुवातीला सभागृहात सत्कार स्वीकारल्यानंतर, त्यांनी संचालकांसह कारखान्याच्या अधिकाऱ्यांसोबत मेगा मीटिंग घेतली. ही मीटिंग बराच वेळ चालल्याने कारखान्याच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. शेवटी अनेक जण घरी निघून गेले. मात्र, माळेगावच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर, त्यांच्या कामाची चुणूक या निमित्ताने पाहायला मिळाली.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार हे स्वतः ‘ब वर्ग’ संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढले. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकतर्फी विजय झाला. संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.
माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या मेळाव्यामध्ये कारखान्याच्या अध्यक्षपदाचा उमेदवार आपण आपल्या नीलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचार शुभारंभवेळी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे अध्यक्षपदाचा उमेदवार कोण, याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
प्रचारादरम्यान व्यक्त केली अध्यक्षपदाची इच्छा
प्रचाराच्या शुभारंभ वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी स्वतः इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, त्यांनी कारखान्याची एखादी सत्ता सभासदांनी द्यावी, माळेगाव कारखान्यासाठी आपण पाच वर्षात ५०० कोटी रुपये कारखाना कार्यक्षेत्रात आणून दाखवू, असे आश्वासन देत माळेगाव कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.
अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची; तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर कारखाना सभागृहात कारखान्याच्या वतीने सत्कार झाल्यानंतर, विविध भागातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, माळेगाव कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर भव्य मंडप उभारून कार्यकर्ते व सभासदांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
सत्कारानंतर लगेच बैठकीला सुरुवात
उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कारखान्याच्या कार्यालयाबाहेर येऊन सत्कार स्वीकारतील, या आशेवर अनेक जण बराच वेळ बसून होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातील सत्कार स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणीच संचालक मंडळ व अधिकाऱ्यांसोबत बैठकीस प्रारंभ केला.
पुढील कामकाजाच्या दिशेवर चर्चा
कारखान्याच्या आगामी वाटचालीबाबत आढावा घेऊन त्यांनी पुढील कामकाजाची दिशा या बैठकीत निश्चित केल्याचे बोलले जात आहे. निवडीनंतर तीन तासाहून अधिक वेळ ही बैठक सुरू होती. त्यामुळे ताटकळत बसलेले अनेक जण शेवटी घरी गेले. सायंकाळच्या ७ वाजल्यानंतरही ही बैठक सुरू होती. मात्र, काही कार्यकर्ते व पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाट पाहत थांबले होते. दरम्यान, कामाच्या बाबतीत ‘खमक्या नेता’ अशी ओळख असलेल्या अजित पवारांच्या या मेगा बैठकीमुळे त्यांच्या कामाची चुणूक कार्यकर्त्यांसह सभासदांना जाणवली.