पुणे : शरद पवारांच्या वक्तव्याबाबत मला बोलायचे नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार आमचेच नेते आहेत, अशा आशयाचे वक्तव्य राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी केले होते. यावर अजित पवारांनी बोलायचे टाळले आहे. अजित पवार आज पिंपरी-चिंचवड येथे आहेत. शहरात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
पाचव्यांदा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपल्या-आपल्या विभागाचे काम झाले पाहिजे असा आमचा ध्यास आहे.
चांद्रयान 3 च्या यशामुळे देशाचे नाव जगभरात
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करीत आहे. चांद्रयान-३ यशस्वी झाले. त्यामुळे देशाचे नाव जगभरात झाले आहे. चांद्रयान मोहिमेमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे.हवामान, संरक्षण आणि नकाशा बनवण्यासाठी याचा उपयोग होईल. देश प्रगत देशांच्या यादीमध्ये जाऊन बसला आहे, असं ते म्हणाले.
भारत चौथी अंतराळशक्ती
चौथी अंतराळशक्ती भारत ठरला आहे. शास्त्रज्ञांनी जे काम केलं त्याची इतिहासात नोंद होईल. प्रत्येक भारतीयाची मान सन्मानाने उंचावेल असे काम वैज्ञानिकांनी केले आहे. अभिमान वाटेल अशी ही घटना आहे. मुंबई,सांगली, जळगाव तसेच जुन्नर, वालचंदनगर येथील गावांची भूमिका महत्त्वाची आहे. मोहिमेमध्ये त्यांचेही योगदान आहे, असं ते म्हणाले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनची करण्याचा उद्देश
पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची करण्याच उदिष्ट ठेवले आहे. आम्हीही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवलंय की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनची करायची आहे. गेल्या ५०-६० दिवसात काम करताना जबाबदारी पार पाडतोच आहे. बाकी आरोप-प्रत्यारोपांना महत्व न देताना राज्याच्या विकासासाठी कमिटी नेमली आहे, असं ते म्हणाले.
चूकबद्दल व्यक्त केली दिलगिरी
एक दिलगिरी मला व्यक्त करायची आहे. त्यादिवशी बोलताना मी चुकून चांद्रयानऐवजी चंद्रकांत बोलून गेलो.यावरुन अनेकांनी खिल्ली उडवली. पण, माझी चूक झाली. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून अशी चूक व्हायला नको होती. माफी मागायची आणि पुढे जायचं अशा मताचा मी आहे, असं अजित पवार म्हणाले.