कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार
अकोला : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात जाहीर झालेल्या पात्र खातेदारांच्या यादीत सुमारे दीड हजार मृत खातेदार आणि साडेसहा हजार शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅक नोंदणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, 78 टक्के शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांचा कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे.
अॅग्रिस्टॅक नोंदणी न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ९० हजार ८७९ शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर अपलोड केला होता. त्यापैकी ४९ हजार २५० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी २६ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. या यादीतील ३८ हजार ४१५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण ७८ टक्के आहे.
Satara News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर किशोर सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे
राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेदारांची संख्या अधिक आहे. तर दुसऱ्या यादीत राष्ट्रीयीकृत बँकांच्या खातेदारांचा समावेश होणार आहे. याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचे लाभार्थी जिल्ह्यात मोठ्या संख्येने असल्याने प्रोत्साहनपर अनुदानाची यादी कधी जाहीर होते.
महसूल विभागाने पुढाकार घेण्याची गरज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांपैकी साडेसहा हजार शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. अॅग्रिस्टॅक नोंदणीची प्रक्रिया महसूल विभागाच्या माध्यमातून केली जात असल्याने पात्र शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून हा अनुशेष पूर्ण करण्याची गरज आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते.
KYC ची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात
कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची केवायसीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही अॅग्रिस्टॅक नोंदणी केली नाही. अशांनी नोंदणी करावी. याशिवाय मयत असलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांना या प्रक्रियेचा लाभ आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर मिळणार आहे.
– गीतेशचंद्र साबळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला






