अकोला : जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीला विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्यास विलंब करण्यात येत असल्याचा आरोप करीत पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा परिषदेवर धडक दिली. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्यावर यावेळी प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती आणखी गतिमान करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्याचे सूञांनी सांगितले.
[read_also content=”सुरज जाधवच्या आत्महत्येतून ऊर्जा मंत्रालय धडा घेणार का ? https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/will-the-ministry-of-energy-learn-a-lesson-from-suraj-jadhavs-suicide-nraa-250061.html”]
आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ २४ दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सुरू असलेली कामे, प्रलंबित प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्याच्या प्रक्रियेला आता गती आली असली तरी जिल्हा परिषदेकडून काही प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यास विलंब होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. यावेळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी सौरभ कटियार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
[read_also content=”अंत्यसंस्कारासाठी जळावू लाकूड मिळेना, कुटुंबियांना करावी लागतेय भटकंती https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/if-firewood-is-not-available-for-the-funeral-the-family-has-to-wander-nraa-250029.html”]
काय आहे निवेदनात ?
प्रहारने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार, जिल्हा नियोजन समितीने २० जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जिल्हा परिषदेला २०२१-२२ या वर्षासाठी विकास कामांचे प्रस्ताव देण्यास सांगितले होते. नियोजन समितीने पाच पत्र दिली होती, परंतु पाठपुरावा केल्यानंतरही जि.प.च्या विविध विभागांनी प्रस्ताव सादर केले नाहीत. त्यामुळे विकास कामांना खीळ बसल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जि.प.ची राहील, असा इशारा प्रहारने या निवेदनातून दिला आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पूलांच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला असून, या प्रकरणी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर कारवाईची मागणीही वंचितने केली आहे. यावर कामांत भ्रष्टाचार झाला असल्यास धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर जाऊन हात कलम करेन, मात्र भ्रष्टाचार झाला नसल्यास पुंडकर काय करतील, असा सवाल करीत पालकमंत्री कडू यांनी संताप व्यक्त केला होता.