सौजन्य - नवराष्ट्र टीम
सांगली/प्रवीण शिंदे : विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला सहज सोप्या वाटणाऱ्या लढती विरोधक निश्चित झाल्यावर कमालीच्या चुरशीच्या झाल्या. एकतर्फी वाटणारी निवडणूक नेत्यांच्या सभा व राजकीय डावपेचाने चुरशीची झाली आहे. सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, शिराळा, जत व खानापूर मतदारसंघांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत अनेक मात्तबर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये चुरस
तासगाव-कवठेमहांकाळ हा परंपरागत दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा मतदारसंघ या ठिकाणी सुरुवातीला रोहित पाटील यांना सहज सोपी वाटत असलेली निवडणूक जिल्ह्यात सर्वात चुरशीची ठरली. दोनवेळा खासदार राहिलेले माजी खासदार संजय पाटील (काका) यांची उमेदवारी खूपच तगडी ठरली, त्यांची यंत्रणा, अनुभव, आणि आक्रमक प्रचार रोहित पाटील यांना घाम फोडणारा ठरला. संजय पाटील यांनी ऐनवेळी हातात बांधलेले घड्याळ, अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या सभा, आक्रमक प्रचार विरुद्ध भावनिक प्रचार यात कोण सरस ठरणार हे ठरविणे मुश्किल आहे.
जतमध्ये जात की भूमिपुत्र पॅटर्न ?
लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक कल दिलेला मतदार संघ म्हणजे जत, याचाच अंदाज घेऊन भाजपने विधनपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. पडळकर यांच्या बाजूने जातीय ध्रुवीकरण पहायला मिळाले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ झाल्याने सुरुवातीला पडळकर यांची जोरदार हवा झाली. मात्र, तालुक्याच्या बाहेरचा उमेदवार नको, भूमिपूत्र हवा, अशी भूमिका घेत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे व तम्मनगौंडा रखी पाटील यांनी बंडाचे निशाण उगारले. माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला. तर प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेसचे आमदार विक्रमसिह सावंत यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपची लोकसभेतील नेत्यांची एकजूट विधानसभेला तुटली. पडळकर यांची हवा चालते, सावंत यांना कामाची पावती मिळते की, रवी पाटील यांची बंडखोरी यशस्वी होते, याची जतकरांना उत्सुकता आहे.
देशमुखांच्या बंडखोरीने बिघडली खानपूरची गणिते
खानापूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्यानंतर महायुतीने शिंदेसेनेचे सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारसंघात अनिल बाबर यांच्या सहानुभूतीने ही निवडणूक बाबर यांच्यासाठी सोपी जाईल, असे सुरुवातीचे अंदाज होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडून अॅड, वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यात यश आले. मात्र, राजेंद्र देशमुख यांनी बंडखोरी केल्याने पुन्हा दोन्ही उमेदवारांच्या एकास एक लढतीचे गणित बिघडले. विसापूर सर्कल, विटा शहर, खानापूर ग्रामीण व आटपाडी तालुक्यातील किती आणि कोणत्या उमेदवाराची मते राजेंद्र देशमुख घेणार, यावर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
बंडखोरी ठरणार काँग्रेसची डोकेदुखी ?
महाविकास आघाडीने मात्र देशातील व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा सांगली जिल्ह्यात सर्वाधिक घेतल्या. त्याचा फायदा विविध मतदारसंघांत वातावरण निर्मितीसाठी झाल्याचे दिसून आले. सांगली विधानसभेतील भाजपचे उमेदवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सभा झाल्या, तर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सभा झाली. मात्र, काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार जयश्री पाटील या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची किती मते खेचून घेणार, यावर गाडगीळ की, पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाचे गणित ठरणार आहे.
शिराळ्यात नाईक-देशमुखांत काटा लढत
विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गतवेळीच्या निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी होऊन विजय सोपा झाला होता. या निवडणुकीतही सम्राट महाडिक यांनी बंडखोरीचे निशाण उगारले होते. मात्र, महायुतीला महाडिक यांची बंडखोरी रोखण्यात यश आले. त्यामुळे शिराळ्यात महाविकास आघाडीचे नाईक विरुद्ध महायुतीचे सत्यजित देशमुख अशी एकास एक लढत होत आहे. या ठिकाणी वाळवा तालुक्यातील ४८ गावे निर्णायक ठरणार आहेत. मात्र, या गावातून विविध अफवा पसरविण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून करण्यात आला आहे. त्यामुळे ४८ गावांतील मतदान हे देशमुख की नाईक यांना तारक ठरणार, याविषयी उत्सुकता वाढली. ही उत्सुकता मतदारांसाठी मुंबईतून खासगी बसने शिराळ्यात आलेल्या प्रत्येक मुंबईकराला आहे.