मंचर : माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी मंचर (Manchar)येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले (YatinKumar Hule)यांनी सोमवारी (दि.५) दिली.
अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंचर येथील संत ज्ञानेश्वर पंतसंस्थेसह इतर पतसंस्थावार चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा ठपका ठेवत तीन वर्षाच्या ऑडिटची मागणी केली. त्यावर संत ज्ञानेश्वर पंतसंस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश घीसे, संचालक बाळासाहेब घुले, अशोक करंडे, डॉ. सचिन भालेराव, नवनाथ बाणखेले, विलास लबडे, कैलास बांगर, प्रवीण आजाब, लतिका काळे, वत्सला जाधव, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर, काठापुरचे उपसरपंच विशाल करंडे आदी उपस्थित होते.
-पतसंस्थेची बाजू समजून न घेता एकतर्फी आरोप
यतीनकुमार हुले म्हणाले, संत ज्ञानेश्वर पतसंस्था गेली २२ वर्ष शेतकरी सभासदांच्या उन्नतीसाठी सहकारात उज्वलपणे काम करत आहे. अशा संस्थेवर किरीट सोमय्या यांनी आरोप करणे लांचनास्पद बाब आहे. आम्ही त्यांना आमची बाजू मांडण्यासाठी मुंबई येथे वेळ देण्याची विनंती केली. त्यावर मंचर येथे पतसंस्थेत येतो असे मान्य करून ते इथे आले नाहीत. त्यामुळे ते एकतर्फी आरोप करतात. हि बाब योग्य नाही. त्यांनी पतसंस्थेची ही बाजू समजून घेऊन त्यावर भाष्य केले असते तर बर झाले असते.
-संस्थेच्या चौकशीसाठी तयार
हुले पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षात पतसंस्थेने ५ शाखा सुरू करून तेथेही अत्यंत पारदर्शकपणे काम सुरू केले आहे. काही कर्जदारांनी कर्ज घेऊन आम्हाला कर्ज दिलेच नाही, असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. आमची पतसंस्था कोणत्याही सभासदाकडून कोरे चेक घेत नाही. चेकवर सबंधित सभासदाच्या हस्ताक्षरात नावे टाकून आम्ही चेक घेतो. त्यामुळे कोणत्याही सभासदाची कर्जप्रकरणी फसवणूक केलेली नाही. आम्ही संस्थेच्या चौकशीसाठी केव्हाही कधीही कोठेही तयार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
-पतसंस्था कोरे चेक घेत नाही
चेक किंवा आरटीजीएस या स्वरूपात त्या कर्जदाराच्या खात्यावर आपण पैसे पाठवतो. त्यामुळे सर्व गोष्टी कायदेशीररित्या पूर्ण करूनच कर्ज वाटप केले जाते. यात ज्या तक्रारदारांची नावे आहेत त्यातील काही तक्रारदारांनी कर्ज भरत आहे. पतसंस्था कोणत्याही प्रकारचे कोरे चेक घेत नाही. चेक हे नाव टाकून रक्कम टाकून तारीख टाकूनच त्या कर्जदाराकडून घेतले जातात.
-राजकीय हस्तक्षेपामुळे सहकार क्षेत्र मोडीत निघेल
आमची संस्था सर्वसामान्य शेतकऱ्यांची असून पूर्णपणे शेतकऱ्यांचा विश्वास संस्थेवर आहे. काही लोकांच्या स्वार्थासाठी या प्रकारचे आरोप जर पतसंस्थांवर होत राहिले आणि त्यात जर राजकीय हस्तक्षेप होत राहिला तर सहकार क्षेत्र मोडीत निघेल. शेतकऱ्याला कर्जपुरवठा देण्यासाठी कोणीही तयार होणार नाही, असे हुले यांनी ठणकावून सांगितले.