धुळे : लोकसभा मतदारसंघासोबत महाराष्ट्राच्या 20 उमेदवारांची यादी भाजपने जाहीर करत महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी घेतली. आता सर्वांचे लक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेच्या आघाडीकडे लागले असतानाच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम उतरणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
महाराष्ट्रात 6 जागा एमआयएम लढविणार अशी माहिती खासदार जलील यांनी दिली आहे. एमआयएमची धुळे लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असल्याने एमआयएम धुळे लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट होत आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना आजपर्यंत रंगला. मात्र, भाजप आणि काँग्रेस यांना समान विरोध करत मुस्लिम समाजाला एकत्र करून वेगळे राजकारण करणारा एमआयएम पक्ष राष्ट्रीय राजकारणासह महाराष्ट्रातही लक्षवेधी ठरला आहे.
एमआयएमने मुस्लीम बहुल मतदारसंघांमध्ये ताकद निर्माण केली आहे. पूर्वीच्या औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तसेच मुंबई, भिवंडी, मालेगाव आणि त्यापाठोपाठ धुळे विधानसभा मतदारसंघात एमआयएमने आपली ताकद सिद्ध केली आहे.