ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
Laxman Hake Marathi News : बारामती : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील चर्चेत आले आहेत. ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनेकदा त्यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त विधाने देखील केली आहे. मात्र आता लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी (दि.27) रोजी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस सुरक्षा असताना देखील हा हल्ला झाल्यामुळे लक्ष्मण हाके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नाही. यावेळी पोलीस देखील असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी झालेल्या या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, माझ्यावर हल्ला करणारा जो दळवी आणि त्याचे सहकारी आहेत यांचे फोटो आता समोर आले आहेत आणि यांचे फोटो शरदचंद्र पवार आणि निलेश लंके यांच्यासोबत देखील आहेत, या सर्व लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे. माझी आणि या माणसांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण पवार कुटुंबाने असे गुंडे पोसलेले आहेत. आज त्याच गुंडानी माझ्यावर हल्ला केला, अशा स्पष्ट शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप केला.
अंतर्गत विवाहाबद्दल बोललो म्हणून माझ्यावर हल्ला
पुढे लक्ष्मण हाके म्हणाले की, माझ्यावर आजपर्यंत ८ ते ९ हल्ले झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. हल्लेखोरांवर कारवाई झाली असती तर मला आज संरक्षण द्यायची सुद्धा गरज पडली नसती. पोलिसांचा संरक्षण असताना देखील काल माझ्यावर हल्ला झाला, या लोकांना वर्दीची भीती नसावी, यांना माहिती आहे की हल्ला केल्यावर काहीच होत नाही, अजून अनेकांवर हल्ला करतील. हे आता सांगत आहेत की अंतर्गत विवाहाबद्दल बोललो म्हणून माझ्यावर हल्ला केला, या लोकांना कल्पना नाही की छत्रपती शाहू महाराजांनी शंभर पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह लावून दिले होते, यांना शाहू महाराज कळायला यांच्या पुढच्या शंभर पिढ्या जातील, अशा शब्दांत ओबीसीनेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे लक्ष्मण हाके म्हणाले की, हल्ल्यात 10 ते 12 जण सहभागी होते. पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असूनही हल्लेखोरांनी दोन ते तीन फुटांचे बांबू घेऊन आमच्यावर बेछूट प्रहार केला. अवघा दहा सेकंदांचा जरी उशीर झाला असता तरी बांबू थेट आमच्या डोक्यात बसले असते. महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचे काम या मंडळींनी केलं आहे. पाहुण्या रावळ्यांचं राज्य या लोकांनी महाराष्ट्रावर आणलं, सहकारी संस्था यांच्या नावावर केल्या. महाराष्ट्र राज्यातला 50 ते 60% ओबीसी समाज हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे, हा समाज आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडले