फोटो - टीम नवराष्ट्र
अकोला : अकोल्यामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच हा हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही विचारपूस केली नसल्यामुळे नाराजी देखील व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत मनसे कार्यकर्ते कर्णबाळा दुनबळे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच सर्व अकोला पोलिसांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी केली आहे.
जीव गेल्यावर मुख्यमंत्री जागे होणार आहात का?
आमदार अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे नेते आहेत. महायुतीमध्ये अजित पवार देखील सामील झाले आहेत. मात्र मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणतीही चौकशी केली नाही. यावर अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार मिटकरी म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही राज्याचे पालक आहत तुम्ही हे कसं सहन करु शकता? एकनाथ शिंदे यांना माझा प्रश्न आहे की माझा जीव गेल्यावर तुम्ही जागे होणार आहात का? कर्णबाळा दूनबळे माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही कराण त्याच्यासोबत फक्त मनसेचे गुंड आहेत माझ्यासोबत महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचा मी सदस्य आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाचे मुख्यमंत्री सभासद आहेत, एका आमदारावर हल्ला झाला मला अपेक्षा अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली पहिजे होती. एकनाथ शिंदे यांनी पण करायला पाहिजे होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझी चौकशी केली. अशाप्रकारे सर्वजण विचारतात पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विचारत नाहीत. एका 12-13 वर्षाच्या मुलीच्या बापावर असा प्रसंग असताना मुख्यमंत्री शांत बसत असतील तर हे चित्र चांगले नाही, अशा शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अकोला पोलिसांची SIT चौकशी करा
अकोल्यामध्ये हा प्रकार घडला असल्यामुळे अमोल मिटकरी यांनी अकोला पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमोल मिटकरी म्हणाले, आमदाराच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे. अकोल्यात कायदा-सुव्यवस्था किती रसातळाला गेलीय, त्याचं हे उत्तम उदहारण आहे. त्याला इतकी मस्ती का आहे? कशाच्या बळावर इतकी मुजोरी दाखवतोय? पोलिसांचे अभय असल्याशिवाय हे होऊच शकत नाही. सर्व अकोला पोलिसांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. हे चित्र महाराष्ट्रासाठी बरे नाही, अशा प्रकारे जर खुनशी लोकं सत्तेत बसवली तर महाराष्ट्रात आग लागेल, गोरगरीब लोकं मरुन जातील. कर्णबाळा मोकाट सांडासारखा सुटलाय. कर्णबाळा पोलिसांचा जावई आहे का? माझा जीव जाईपर्यंत अकोले पोलीस वाट पाहणार का? – जर मला न्याय द्यायचा असेल तर जिवंतपणी द्या मेल्यावर नको, अशा कडक शब्दांमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर झालेल्या हत्येचा निषेध केला आहे.