प्रतिकात्मक फोटो
मुंबई : राज्यातील शिक्षण सेवकांसाठी (Education News) राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. त्यानुसार, शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय (Maharashtra Government Decision) यापूर्वी घेण्यात आला होता. आज त्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो शिक्षण सेवकांना होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून या शिक्षण सेवकांच्या मानधनात झालेली वाढ लागू होणार आहे.
प्राथमिक आणि उच्च प्राथमिकच्या शिक्षण सेवकांचं मानधन 6 हजार रुपयांवरुन 16 हजार रुपयांवर नेण्यात आलं आहे. माध्यमिकच्या शिक्षण सेवकांचं वेतन 8 हजार रुपयांवरुन 18 हजार रुपये करण्यात आलं आहे. तर उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षक सेवकांचं वेतन नऊ हजार रुपयांवरुन 20 हजार रूपये करण्यात आलं आहे. राज्य शासनाकडून आजच याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.
दरम्यान, या शिक्षण सेवकांच्या पूर्वीच्या मानधनात सप्टेंबर 20211 मध्ये वाढ करण्यात आली होती. त्यानुसार सध्या प्राथमिक शिक्षकांना सहा हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना आठ हजार रुपये आणि उच्च माध्यमिक (कनिष्ठ महाविद्यालय) शिक्षकांना नऊ हजार रुपये मानधन दिले जात होते. गेल्या नऊ वर्षांत शिक्षण सेवकांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नव्हती. पण आता भरघोस वाढ करण्यात आली आहे.
मानधनवाढीची सातत्याने होत होती मागणी
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी शिक्षक संघटना आणि शिक्षण सेवकांकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. या मागणीनुसार लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा मानधन वाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेसाठी घेतला होता. अखेर आज जीआर काढून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.