मुंबई : राज्यामध्ये अनेक संघटना आपल्या हक्कांसाठी आंदोलन पुकारताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi worker) संप पुकारला होता. आता आशा स्वयंसेविका (Asha Workers Strike) आणि गटप्रवर्तकांनी (Group promoter) आक्रमक भूमिका घेत संपाचा इशारा दिला आहे. शिंदे फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) मोबदला वाढीचा शब्द देऊन तो पूर्ण न केल्यामुळे आशा सेविकांनी 12 जानेवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारला (State Govt) दिला आहे.
सध्या राज्यभरात तब्बल ७० हजार आशा स्वंयसेविका तर साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. नोव्हेंबर महिन्यामध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी आंदोलन पुकारले होते. तब्बल 22 दिवस सुरु असलेल्या या आंदोलवेळी शिंदे फडणवीस सरकारने आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यामध्ये 7 हजारांनी वाढ आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेत गटप्रवर्तकांचे मानधन १० हजार रुपये करण्याच्या सूचना अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना फोन करुन दिल्या. तसेच संप काळातील मानधन देण्याचे देखील कबुल केले. मात्र प्रत्यक्षामध्ये यातील कोणतीही आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाही.
अद्याप संपकाळातील मोबदला देण्यात आलेला नाही तसेच मानधन वाढवण्याबाबतही शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत हिवाळी अधिवेशनादरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल न घेतल्यामुळे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 29 डिसेंबर पासून आशा सेविकांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार घातला आहे. तसेच मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास येत्या 12 जानेवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी राज्य सरकारला दिला आहे.