फोटो - नवराष्ट्र टीम
देहू : आषाढी वारीची सुरुवात झाली आहे. आज देहूनगरीमधून संत तुकाराम महाराजांच्या वारीचे प्रस्थान झाले आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरि नामाच्या जयघोषामध्ये पालखी निघाली आहे. वारकऱ्यांच्या उत्साहसह संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. यामुळे संपूर्ण देहू परिसरामध्ये चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. लाखो वारकऱ्यांसह तुकोबारायांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणामध्ये प्रस्थान झाले आहे.
मागील महिन्याभरापासून पालखी सोहळ्याची तयारी केली जात होती. आज पालखीचे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्यासाठी संपूर्ण देहू शहर सजले आहे. मंदिर परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडूंच्या फुलांच्या माळ्यांनी मंदिर सजवण्यात आले आहे. यंदा पालखीचे 339 वे वर्षे आहे. त्यामुळे मंदिर संस्थानाने देखील जोरदार तयारी केली आहे. पालखीला आणि रथाला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. मंदिरामध्ये टाळ- मृदुंगाचा गजर सुरु असून वारकऱ्यांनी भक्ती भावाने पालखी सोहळ्यामध्ये उपस्थिती लावली आहे.
फोटो – नवराष्ट्र टीम
सकाळपासून देहूच्या मंदिरामध्ये भजन व अभंग म्हटले जात आहे. मंदिर परिसरामध्ये अनेक दिंड्या आल्या असून दर्शनाला देखील मोठी गर्दी झाली आहे. देहूनगरीमध्ये लाखो भाविक जमले असून वारकऱ्यांमध्ये वारीचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. इंद्रायणीच्या काठी वारकऱ्यांनी स्नान करत आपल्या आषाढी वारीला सुरुवात केली आहे. आज दुपारी 2 वाजता पालखीने मंदिरातून प्रस्थान केले. हरि नामाचा जयघोष व तुकोबारायांचा गजर यामुळे देहूमधील संत तुकाराम महाराज मंदिर परिसर दूमदुमून गेला आहे.