माणिकराव कोकाटेंची आमदारकी, मंत्रिपद जाणार? विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बंद दाराआड चर्चा
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्यांना २ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांच्या शिक्षेला तुर्तास स्थगिती देण्यात आली असली तरी आमदारकी आणि त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरू आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाणार की राहणार याकडे लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री कोट्यातून कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कमी दरात घरं उपलब्ध दिली जातात. त्यासाठी नागरिकांना त्यांच्या नावावर राज्यात कुठेही सदनिका नसल्याचं प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रं सादर करावी लागतात. याच योजनेतून माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये सदनिका मिळवली होती. आवश्यक कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. याच इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन(कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिक कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
१९५१ च्या कायद्यातील कलम ८ (३) मध्ये शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही गुन्ह्यात दोन वर्षांपर्यंत शिक्षा झाल्यास शिक्षा सुनावल्यापासून सदस्य अपात्र ठरू शकतात. तसंच शिक्षा भोगून आलेल्या लोकप्रतिनिधीला पुढील ६ वर्षे निवडणूक लढवता येत नाही. आता माणिकराव कोकोटे यांच्या संदर्भातील प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान आजपासून विधानसभेचं अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झालं आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये विधीमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा करण्यात झाली. 10 ते 15 मिनिटं चौघांमध्ये बंद दाराआड चर्चा करण्यात आली. या बैठकीतील चर्चा अद्याप समोर आलेली नाही. मात्र, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.