अमरावती : लोकसभा निवडणुकीमध्ये एकाच युतीमध्ये असून बच्चू कडू यांनी भाजपविरोधात भूमिका घेतली होती. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी ही उमेदवारी मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी अमरावतीमध्ये राणांविरोधात आमदार उभा केला. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. यानंतर बच्चू कडू यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांच्या निर्णयामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे महायुतीचे नेते बच्चू कडू यांची मनजुळवणी करण्यामध्ये महायुतीला यश येते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही युतींची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यामध्ये आता बच्चू कडू यांनी देखील महत्त्वाची भूमिका घेतली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 20 ते 25 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत. पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार आहोत. याशिवाय बडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्याने रवी राणा आणि महायुतीचं टेन्शन वाढणार आहे.
रवी राणांची भाषा योग्य नव्हती
खासदार बळवंत वानखडे हे बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला. ही निवडणूक धर्मावर झाली. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्दावर निवडणूक लढलो. आमच्याच उमेदवारीमुळे नवनीत राणा पराभूत झाल्या यात फार तथ्यही नाही. भाजपने उमेदवारीला विरोध केला तरी उमेदवारी दिली त्यात रवी राणाची भाषा योग्य नव्हती. रवी राणा हे आम्हाला घरी येऊन मारण्याच्या धमक्या देतात आणि त्यांचं काम आम्ही करायचं का? एवढं अपमानित होऊन आम्हाला जगता येत नाही, असे उत्तर बच्चू कडू यांनी दिले आहे.