अपूर्ण महामार्गासाठी भूमीपूत्रांचे बँड बाजा आंदोलन
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या निकृष्ट कामामुळे वाहने तिन-चार तास कोंडीत अडकून पडत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भूमीपूत्र फाऊंडेशन ने महामार्गावर बँण्ड बाजा वाजवून आंदोलन केले.या महामार्गावर व्हाईट टॉपिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मात्र या कामात सातत्य,नियोजनाचा अभाव,दर्जाहिन असल्याने वाहतुककोंडी आणि अपघाताच्या मालिका वाढल्या आहेत.दोन महिन्यांपुर्वी ससुपाडा येथील जे के टायर शोरूमसमोर नाल्याचे काम करताना रस्ताच खचला होता.हा रस्ता अजूनही प्राधिकरणाकडून दुरुस्त झाल्याने दोन्ही बाजुंची वाहतुक कोंडी होत आहे.शिरसाड फाट्यापासून घोडबंदरला जाण्यासाठी तब्बल तिन-चार तास लागत असल्यामुळे वाहन चालकांनी रेल्वे प्रवासावर भर दिला आहे.त्यामुळे रेल्वे आणि प्रवाशांवर अतिरिक्त भार पडत चालला आहे.
वारंवार मागण्या करुनही महामार्ग दुरुस्त करण्यात येत नसल्यामुळे शुक्रवारी दुपारी भूमीपूत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बॅंड बाजा आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील अल्मेडा,प्रकाश पाटील,किरण शिंदे यांच्यासह काॅंग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.तसेच आसपासच्या गावातील महिला आणि बालकेही आंदोलनात उतरले होते.
दुपारी साडेबारा वाजता या आंदोलनाला सुरूवात झाली.यावेळी महामार्गावरील खड्डे फुलांची रांगोळी काढून सजवण्यात आले होते.तसेच ‘वर्क इन प्रोग्रेस’ या फलकाला हार घालून श्रध्दांजली वाहण्यात आली.आंदोलनावेळी महामार्गांवर कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलीस आणि शहरी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त होता.