भाईंदर/विजय काते : काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर “मीरा-भाईंदरमधील 200 कोटी रुपयांची जागा फक्त 3 कोटी रुपयांत लाटली” असा गंभीर आरोप करताच, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या आरोपांवर आता प्रताप सरनाईक यांनी सविस्तर खुलासा करत सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आज (शनिवार) सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा तपशीलवार खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेली जागा माझ्या सुनेच्या सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी भाडे तत्त्वावर देण्यात आली आहे. ही जमीन खरेदी केलेली नसून, केवळ भाडे तत्वावर घेतली असून सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच हा व्यवहार करण्यात आला आहे.”
सरनाईक पुढे म्हणाले, “या जागेचा कब्जा आणि वहिवाट पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने झाली आहे. या व्यवहारासाठी आम्ही4 कोटी 55 लाख रुपयांचा मुद्रांक भरला आहे तसेच 1कोटी 28 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीही जमा केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच निर्माण होत नाही. सर्व कागदपत्रे शासन नियमांनुसार तयार करण्यात आली आहेत.”
त्यांनी स्पष्ट केले की, या ट्रस्टमार्फत त्या जागेवर शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्प राबवले जाणार आहेत. “ही जमीन कोणत्याही प्रकारे माझ्या वैयक्तिक नावावर किंवा माझ्या कुटुंबातील कोणाच्या नावावर नाही. ट्रस्टमार्फत सर्व काम पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे,” असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले, “मी एक मंत्री म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहे. माझ्या चांगल्या कामामुळे काही राजकीय नेते मतभेद निर्माण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. विजय वडेट्टीवार यांच्याशी माझे बोलणे झाले असून त्यांना मिळालेली माहिती अर्धवट होती. मी त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितला आहे.”
सरनाईक यांनी सांगितले की, प्रारंभी या आरोपांबाबत त्यांनी कायदेशीर नोटीस देण्याचा विचार केला होता, मात्र वडेट्टीवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गैरसमज दूर झाले. त्यामुळे सध्या या विषयावर पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेवटी सरनाईक म्हणाले, “माझ्याविरोधात केलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, माझ्या कामाची पारदर्शकता माझी ताकद आहे. मीरा-भाईंदरमधील सर्व विकासकामे नियमांचे पालन करूनच केली जात आहेत.”
या खुलाशामुळे सध्या मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात निर्माण झालेल्या तणावावर काही प्रमाणात पडदा पडला असून, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याने हा वाद तात्पुरता शांत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.






