संग्रहित फोटो
रहिमतपुर : रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आपल्या पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. रहिमतपूर मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुनील माने यांनी ही माहिती दिली. यावेळी धामणेरचे माजी सरपंच शहाजीराव क्षीरसागर व वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचे नेते संभाजीराव गायकवाड, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे यांची उपस्थित होती.
माने म्हणाले, गेली दहा ते अकरा वर्षापासून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी काम करत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर वैयक्तिक कारणामुळे अजित पवार गटात प्रवेश केला नव्हता, परंतु रहिमतपूर व परिसरातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ तारखेला संध्याकाळी सहा वाजता रहिमतपूर येथील गांधी चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असून, यावेळी कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांच्यासह रहिमतपूरमधील अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे.
शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व सर्व समावेशक आहे. परिसराच्या व गावच्या हिताचा विकासाचा विचार करून अजित पवार गटात प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून परिसराच्या विकास कामासाठी भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो.
बाळासाहेब पाटील यांना धक्का
सुनील माने यांनी दिलेला राजीनामा शरद पवार व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी अजित गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला होता. सुनील माने अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जात असताना त्यांनी मात्र शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीतह पक्षाला सातारा जिल्ह्यात मोठ्या पराभवाचे तोंड पहावे लागले होते. तरीही माने यांनी शरद पवार गटाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात चांगला जनसंपर्क ठेवला होता. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील माने यांचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी धक्कादायक ठरणार आहे .






