आता १६ मेपासून होणार सीए परीक्षा (Photo Credit- Social Media)
पुणे, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा घेतली. यापैकी १२४ केंद्रांवर मोठया प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. याची गंभीर दखल मंडळाने घेतली असून, या केंद्रांची मान्यताच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती. या पथकांव्दारे केलेल्या पाहणीत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत अशा १२४ केंद्रांची मान्यता पुढील वर्षीपासून कायमची बंद करण्यात येणार आहे. तसेच या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने त्याची सखोल चौकशी होणार आहे.
दरम्यान परीक्षा केंद्रांमध्ये गैरप्रकार होण्यात छत्रपती संभाजी नगर आघाडीवर आहेर येथे तब्ब्ल छत्रपती २१४ प्रकरणे घडली आहेत. तर पुण्यात ४५, नागपूर ३३, मुंबई ९ , कोल्हापूर ७, अमरावती १७, नाशिक १२, लातूर ३७ असे एकूण ३७४ कॉपी प्रकार उघडकीस आले आहेत. तर पुणे विभागात २, छत्रपती संभाजीनगर विभागात ७ व मुंबई विभागात २ अशा ११ कॉपी प्रकरणी परीक्षावेळी गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याचे गोसावी यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार यांचे प्रमाण कमी झाले असून, दहावीच्या परीक्षेत गैरप्रकारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. दोन्ही परीक्षांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक गैरप्रकार झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज ५ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. या बारावी बोर्ड परीक्षेत राज्यभरातून १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावर्षी २०२५ चा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी निकाल १.४९ टक्क्यांनी कमी झाला आहे.
महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे ९ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के आणि लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला. २०२४ मध्येही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के लागला होता. तर मुंबई विभागात सर्वात कमी ९१.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.