सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी वेगाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का देत दोन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे आणि जितेंद्र ननावरे यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
या प्रवेश सोहळ्यात शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, माजी नगरसेवक नाना काटे आणि अजित गव्हाणे उपस्थित होते. चिंचवडमधील अनंत कोऱ्हाळे यांनी पूर्वी चिंचवड विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहिले असून, तेथील राजकारणात त्यांचा चांगला प्रभाव आहे. तर पिंपरीतील जितेंद्र ननावरे यांनी युवासेनेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्द घडविली असून, त्यांच्या प्रभागात त्यांचे मजबूत जनसंपर्काचे जाळे आहे. त्यामुळे या दोघांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी निवडणुकीपूर्वीचा बळकट टप्पा मानला जात आहे.
राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा जोरात
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा संघटित होत असून, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि वरिष्ठ नेते नाना काटे यांच्या समन्वयातून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘‘स्वबळावर निवडणूक लढवायची’’ असा अजित पवारांचा आदेश लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकारी पूर्ण जोमाने कामाला लागले आहेत. या नव्या प्रवेशांमुळे आणि सक्रिय हालचालींमुळे राष्ट्रवादीत पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नवा रंग भरला आहे.






