मुंबई :काल महाराष्ट्राच्या राजकारणात ( Maharashtra Power Politics ) मोठा भूकंप होऊन सत्तेचे राजकारण घडले. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील उभी मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले.
राज्यात सध्या शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. सुरू असलेल्या गोंधळात शरद पवार हे सामान्य मतदारांच्या भरोसा जिंकण्यासाठी महाराष्ट्र पिंजण्यासाठी निघाले आहेत. तर अजित पवार हे पक्षाची मोट बांधताना नविन नियुक्त्या करत आहेत. अशातच प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यावरून शरद पवार चांगेलच भडकले. त्यांनी थेट अजित पवार यांच्या शपथविधीला हजेरी लावणाऱ्या तर पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या पहिल्या फळितील नेत्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना पत्र लिहून या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे. तर यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.