बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Pune District Central Co-Operative Bank) वैयक्तिक कॅश क्रेडिट धारकांना मोठा दिलासा असून, कॅश क्रेडिटवरील व्याजदरात दीड टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, एक ऑगस्ट २०२२ पासून वैयक्तिक कॅश क्रेडिटवरील व्याजदर साडेअकरा टक्क्यावरून दहा टक्के झाला असून, वैयक्तिक कॅश क्रेडिट मर्यादा २० लाख करण्यात आल्याची माहिती बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पगारदार सभासदांना त्यांच्या पगाराच्या वीस पट पंधरा लाखापर्यंत वैयक्तिक कॅश क्रेडिट देते.त्याचा व्याजदर साडेअकरा टक्के होता.तो कमी व्हावा याबाबत शिक्षक संघासह जिल्ह्यातील सर्वच संघटनांनी वेळोवेळी मागणी केली होती.माजी अध्यक्ष रमेश थोरात,विद्यमान अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर यांच्या उपस्थितीत दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींसोबत झालेल्या सहविचार सभेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस केशवराव जाधव यांनी वैयक्तिक कॅश क्रेडिटवरील व्याजदर कमी करावा अशी मागणी केली हाती.
जिल्ह्यातील सर्वच शिक्षक पतसंस्था नऊ टक्के पेक्षा कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करीत असल्याने कॅश क्रेडिटचा व्याजदर जास्त असल्याची भावना शिक्षक व्यक्त करीत होते.गेली दीड वर्षे व्याजदर कमी व्हावा याकरीता केशवराव जाधव यांनी सात्यत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नास यश आल्याने शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे एक लाख रुपायास शंभर प्रमाणे २० लाखाचे दरमहा दोन हजार रुपये व्याज कमी द्यावे लागणार आहे.वर्षाला साधारणपणे चोवीस हजार रुपये व्याज कमी द्यावे लागणार आहे.
वैयक्तिक कॅश क्रेडिट मर्यादा २० लाख केल्याने शिक्षकाना त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविणेकामी मोठा हातभार लागणार आहे. बँकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयांचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाने स्वागत केले असून, लवकरच विरोधी पक्षनेते अजित पवार, बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी अध्यक्ष रमेश थोरात, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे यांना भेटून आभार व्यक्त करणार असल्याचे बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते महादेव गायकवाड यांनी सांगितले.