देवेंद्र फडणवीस यांनी भाजपसाठी आखली विशेष रणनीती (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: राज्यात मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठा विजय मिळवला. खास करून भाजपने 132 जागा जिंकत राज्यातील एक नंबरचा पक्ष होण्याचा मान प्राप्त केला. महायुतीच्या आणि भाजपच्या विजयामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाचा वाटा मोठा आहे. या विजायनांतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील आणि केंद्रात नेत्यांसामोर वजन वाढले आहे.
दरम्यान विधानसभेतील विजयानंतर आता भाजप आणि महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. खास करून भाजपने राज्यातील सर्व समाजास जोडण्यासाठी एक रणनीती आखल्याचे म्हटले जात आहे. या फॉर्म्युलामुळे विरोधक देखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येत आहे. भाजपने राज्यात कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे हेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले जाईल अशी शक्यता होती. मात्र सध्या बावनकुळेच प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. रवींद्र चव्हाण हे माजी मंत्री राहिले आहेत. मात्र भाजपने राज्यात एक नवीन राजकीय समीकरण बांधल्याचे म्हटले जात आहे. ते काय आहे ते जाणून घेऊयात.
या मागची राजकीय गणिते काय?
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही संपलेला नाहीये. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले होते. लोकसभा निवडणुकीत आंदोलनाचा फटका महायुती न भाजपला बसल्याचे म्हटले जात होते. मात्र विधानसभेत तसे काही जाणवले नाही. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जातीय समीकरण साधल्याचे म्हटले जात आहे.
रवींद्र चव्हाण याना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करून भारतीय जनता पक्षाने राज्यातील मराठा समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या समुदायाने भाजपपासून, विशेषतः देवेंद्र फडणवीसांपासून स्वतःला दूर केले होते. परंतु संघाच्या प्रयत्नांमुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला. लोकसभेत बसलेला फटका विधानसभेत बसताना दिसून आला नाही.
भाजपने राज्यात कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करून राज्यातील ब्राह्मण, मराठा आणि ओबीसी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः ब्राह्मण समाजातून येतात. चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातून तर रवींद्र चव्हाण हे मराठा समाजातून येतात. दरम्यान भाजपने हे जातीय समीकरण साधून आगामी निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. मात्र या रणनीतीनुसार भाजप आणि महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे.