सातारा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ईडीकडून (Enforcement Directorate) सलग दोन ते तीन दिवसांपासून चौकशी होत आहे. या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारकडून ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात शुक्रवारी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, येत्या 20 जून रोजी दिल्ली येथे चक्काजाम आंदोलनासाठी साताऱ्यात 200 जण जाणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी सातत्याने जनतेचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे केंद्रातील भाजप सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याचमुळे भाजप काँग्रेस पक्षाविरोधात ठोकशाही आणि दडपशाही करत आहे. काँग्रेस पक्षाने उदयपूरच्या शिबिरामध्ये ‘भारत जोडो’ची भूमिका घेतली होती. याची धास्ती घेऊन भाजपने ईडीच्या माध्यमातून ‘काँग्रेस तोडो’चा प्रयत्न सुरु असून, हा हाणून पाडण्यासाठी देशभरातील काँग्रेसजन रस्त्यावर उतरुन शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत.
आपल्या भारत देशाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचे पाप भाजप करत आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर आणि पोलिसांना पुढे करुन सुरु असलेल्या या दडपशाहीला आम्ही कधीच भीक घालणार नाही. हुकूमशाही मोदी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आम्ही लोकशाही मार्गाने संघर्ष करत राहू.
यावेळी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुरेशराव जाधव, भानुदास माळी, शिवराज मोरे, अल्पना यादव, नरेश देसाई, विजयराव कणसे, प्रदीप जाधव, धनश्री महाडिक, बाळासाहेब शिरसाट, बाबासाहेब कदम, संदीप चव्हाण, दत्तात्रय धनावडे, मनोजकुमार तपासे आदी उपस्थित होते.