सौजन्य - नवराष्ट्र टीम
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर शहराची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. तर जिल्हा पूर्व भागाचे कामकाज माजी आमदार राम सातपुते यांच्यावर सोपविण्यात आले आहे. सोलापूर पश्चिम भागाची जबाबदारी सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बुधवारी राज्यातील जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्त्या घोषित केल्या आहेत. या निवडणुकीत पूर्व भागाचे प्रभारी म्हणून माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या सहा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जबाबदारी निवडणूक प्रमुख म्हणून भाजपाने सोपविली आहे.
जिल्हा पश्चिम भागात समाविष्ट असणाऱ्या बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला या पाच तालुक्यातील होत असलेल्या निवडणुकांचे प्रमुख म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे निवडणूक प्रमुख म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्ती
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलूज, बार्शी, दुधनी, करमाळा, कुर्दुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या नगरपालिकांसह नगर नगरपांचायची निवडणूक होत आहे. तर भविष्यात सोलापूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांचे जिल्हा प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे कामकाज पाहणार आहेत.






