संग्रहित फोटो
भाजपच्या उमेदवार आनंदी काकी जगताप यांना ११३६२ मते मिळाली तर त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन भोंगळे यांना १०२७१ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत जगताप यांना केवळ 682 मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार निकिता राजेंद्र धोत्रे यांना शतक ही पूर्ण करता आले नाही. निकिता धोत्रे यांना केवळ 98 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे 11 प्रभागांमधून तब्बल 582 मतदारांनी नोटाला पसंती दिली असल्याचे दिसून आले आहे.
संजय जगतापांचे वर्चस्व सिद्ध
स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी सासवड नगरपरिषदेवर आपल्या संपूर्ण हयाती मध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. ते स्वतःही नगराध्यक्ष राहिले आहेत तर त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदी काकी जगताप यांनाही त्यांनी नगराध्यक्ष पदावर बसविले आहे. तसेच चंदूकाका जगताप यांच्या यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र माजी आमदार संजय जगताप यांनी नगरपरिषदेवर आपले नेतृत्व वेळोवेळी राखली आहे. दरम्यान संजय जगताप यांना आव्हान देण्यासाठी आमदार विजय शिवतारे यांनी तब्बल 15 वर्षापासून मोहीम लढवली आहे मात्र त्यांना अद्याप पर्यंत एकदाही यश आलेले नाही. मागील निवडणुकीत त्यांचे दोन नगरसेवक निवडून आले होते तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजे दळवी यांचा 100 मतांच्या आसपास इतक्या फरकाने पराभव झाला होता.
मागील पराभवाचा वचपा भरून काढण्यासाठी शिवतारे यांनी यावेळी मोठी ताकद लावली होती. निवडणुकीची संपूर्ण रणनीती आखली होती. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले आहेत. या माध्यमातून त्यांची नगरपरिषदेत नगरसेवकांची संख्या निश्चितच वाढली आहे. मागील निवडणुकीत केवळ दोन नगरसेवकांची संख्या यावेळी मात्र नऊ पर्यंत पोहोचली असल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. मात्र नगराध्यक्ष पदाचे शिवतारे यांचे स्वप्न आद्यपही पूर्ण झालेली नाही.
संजय जगताप यांनी त्यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप यांना निवडणुकीत उतरवून सुरुवातीलाच मोठा शह होता. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन भोंगळे यांच्यावर तब्बल १०९१ मतांनी मात करून विजय संपादन केला आहे. यानिमित्ताने आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या आहेत आणि माजी आमदार संजय जगताप यांचे नगरपरिषदेवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.






