फोटो - टीम नवराष्ट्र
पुणे : आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. यानिमित्ताने पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, पुण्यातील 20 ते 22 मंडळांमध्ये मी जाणार आहे. कष्टकऱ्यांना उर्जा देणारे, तुझ्या जीवावर जग चालू आहे, असा महत्त्वपूर्ण सल्ला देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी कामगाऱ्यांच्या मनातील न्यूनगंड संपवण्याचं काम केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यातून समाजाला एक दिशा दिली. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या विपुल साहित्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्यातून समाजबांधवांनी प्रेरणा घेऊन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा; यासाठी कार्य करावे. त्यासाठी शासनाकडून ही सर्वतोपरी मदत मिळेल” अशी भावना व्यक्त केली.
याचबरोबर चंद्रकांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. सध्याचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आरएसएसकडून देखील हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “बऱ्याच बातम्या माध्यमांकडूनच कळतात. आता ही बातमी कळली असून ती व्हेरिफाय करतो. फडणवीसाचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी येत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक एक पायरी पुढे जायचे असते. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील, तर आम्हा सर्वांना आनंद आहे, त्यांच्यात ते गुण नक्की आहेत. केंद्रीय नेतृत्वाने असा विचार केला असला तर ती आमच्या दृष्टीने सर्वांत आनंदाची गोष्ट आहे,” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.