मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर भाजप आमदार परिणय फुके यांनी निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
Parinay Phuke marathi news : गोंदिया : राज्यामध्ये एकीकडे हिंदी भाषा सक्तीवरुन राजकारण तापलेले असताना आता मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील रंगणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींच्या पूर्वी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरुन आता भाजप नेते व आमदार परिणय फुके यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
भाजप आमदार परिणय फुके यांनी गोंदियामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. फुके यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, निवडणुक आल्या की मनोज जरांगे बाहेर येतात आणि निवडणुक संपले की परत बिळात जातात आणि ते स्टंट मारतात. त्यांना मराठा आरक्षणासी काही देणंघेणं नाही. त्यांना आपलं राजकारण करायचं आहे. आणि मराठ्यांची दिशा भूल करायची आहे. पण मराठा समाज आता जागृत झाला आहे, अशा शब्दांत आमदार परिणय फुके यांनी निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईमध्ये येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्रितपणे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मोर्चा काढणार आहे. प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा पर्यायी भाषा म्हणून देण्यात आली आहे. याविरोधात मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय ठाकरे बंधूंचा हा मोर्चा निघणार आहे. याबाबत देखील परिणय फुके यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “म मराठीचा… की महानगरपालिकेचा म.. असा सवाल त्यांनी ठाकरे बंधूंना विचारला. जेव्हा निवडणूक येतात तेव्हा यांचा मराठी प्रेम जागृत होतो अशी टीका केली आणि दोन्ही ठाकरे बंधूंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर पुढे बोलताना दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करतात”असाही टोला यावेळी परिणय फुकेंनी लगावला आहे. यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आमदार परिणय फुके म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही होत नाही. दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे तर काही होऊ शकेल, असा टोला दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांनी लगावला आहे.