'छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागतं का?'; खासदार उदयनराजे केंद्रासह राज्य सरकारवर चांगलेच संतापले (File Photo : UDAYANRAJE-BHOSALE)
पुणे : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध मुद्यांवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या मुद्यावरून काही विधानेही समोर आली आहेत. त्यावर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘यासंदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झालेले नाहीत. कायदा तयार करायला बजेटची गरज लागतं का?’ असा सवाल उपस्थित करत उदयनराजे भोसले यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांची 336 वी जयंती आहे. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील समाधीस्थळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रासह राज सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी सध्याच्या राजकारण आणि महापुरूषांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. उदयनराजे यांनी म्हटले की, ‘सर्वधर्म समभाव ही भावना घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे एकत्र आणलं. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. ज्या स्वराज्यात आपण सगळे राहत आहोत. ती स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराजांची होती. आपल्यातील कोणीच देव बघितला नाही. पण आमच्यासाठी शिवाजी महाराजच देव आहेत’.
तसेच उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा वारंवार अपमान व्हावं, असं आपल्या लोकप्रतिनिधींना वाटतं का? असा सवाल केला आहे. तर त्यांना जर तसं वाटत नसेल तर त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीनं सिद्ध करून आता द्यावं, असेही म्हटलं आहे.
एकच वाघ होऊन गेला तो म्हणजे शिवाजी महाराज
वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं. ‘वाघ्या कोण? वाघ्या एकच, वाघ होऊन गेला तो म्हणजे शिवाजी महाराज. तसेच त्यांनी राज्यातील अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? असा सवाल करताना मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्याने दूध पितात का अवमानबाबत त्यांना कळायला हवं, अशीही थेट टीका केली आहे.
…ते लोक हलकट आहेत
जे राज्यात राहून औरंगजेबाचं स्टेट्स ठेवतात, ते हलकट आहेत. त्यांना देशाच्या बाहेर पाठवा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झालेले नाहीत. कायदा तयार करायला बजेटची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.