कावळे बांधताहेत जाड फांद्यांवर घरटी; घरट्यांवरून बांधला जातोय पावसाचा अंदाज
यावर्षी पाऊस चांगला कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा 96 ते 100 टक्के पाऊस अपेक्षित आहे. नेमका हाच अंदाज कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या सवयींवरूनही लावला जात असून, यंदा कावळे शक्यतो जाड फांदी पाहून आणि मध्यभागी घरटी बांधताना दिसून येत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळते.
शेतकरी आजही आपल्या पारंपरिक कसोट्या, बदलती निसर्गचित्रांचा अंदाज घेतात. मृग नक्षत्रापूर्वी पक्षी झाडांवर घरटी बांधू लागले की, पावसाची चाहूल लागते. पारंपरिक अंदाजानुसार पक्षी झाडावर किती उंचीवर, कोणत्या
प्रकारच्या फांदीवर घरटे बांधतात, यावरून यंदा पाऊस कसा होईल याचे अनुमान शेतकरी काढतात. यंदा कावळा झाडाच्या जाड फांदीवर घरटे बांधत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे चांगल्या पावसाचे भाकीत असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे यावर्षी पर्जन्यमान काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे राहील, असा अंदाज बांधला जात आहे.
पक्ष्यांना व विशेषतः कावळ्यांना पावसाचा तंतोतंत अंदाज कळतो, असे म्हटले जाते. त्यानुसार ते पावसाळ्यात आपली तजवीज करतात. जेव्हा पक्षी उंच शेंड्याकडील फांदीवर घर बांधतात, तेव्हा त्याला पाऊस जास्त होणार असल्याचा अंदाज आला असतो. यापूर्वीही पारंपरिक ठोकताळ्यांवरून पर्जन्यवृष्टीचे आकलन केले जात होते. एप्रिल ते जून महिन्यादरम्यान कावळ्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू असते. अर्थात त्यांच्यासाठी हा विणीचा काळ असतो. या काळात कावळ्याची मादी घरटे तयार करून अंडी घालते.
वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात
ज्या काळात हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा नव्हती, त्याकाळात पक्ष्यांचे आवाज आणि पावसाळ्यापूर्वी झाडावर बांधली जाणारी कावळ्यांची घरटी कोणत्या स्वरुपात बांधली, यावरून शेतकरी पावसाचे अंदाज व्यक्त करीत होते. ते खरेदेखील ठरत होते, मात्र आता मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्वच धोक्यात आले असून पावसाचे संकेत देणारे कावळ्याचे घरटे दुर्मिळ झाले आहे. पानकोंबडी, पावश्या, मोराचे आवाजही दिवसेंदिवस लुप्त होत असल्याने भविष्यात आपल्याला पावसाचे प्रतिकूल-अनुकूल बदलाचे संकेत देणारे पक्ष्यांचे आवाज आणि कावळ्याची घरटी केवळ पुस्तकात पाहायला मिळतील, अशी भीती काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.