पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये बसला आग लागल्याची घटना घडली. (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : पुण्यामध्ये आगीच आणखी एक घटना घडली आहे. शहरातील अंतर्गत वाहतूकीची धुरा सांभाळणाऱ्या पीएमपी बस डेपोमध्ये आग लागल्याची घटना घडली. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बस डेपोमध्ये बसला आग लागल्याची घटना घडली. आज (दि.09) बसला आग लागल्याची ही घटना घडली. स्वारगेट बस स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी देखील प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच वर्दी मिळताच अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल झाले.
आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास स्वारगेट बस डेपो वर्कशॉप येथील आवारात पीएमपीएमएल बसने पेट घेतल्याची वर्दी अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन मुख्यालयातील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.
घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, बसच्या पुढच्या बाजूने अधिक प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी लगेच चारही बाजूने पाण्याचा मारा करीत सुमारे दहा मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. सदर आगीमध्ये बसचे बरेच नुकसान झाले असून आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.
तसेच या घटनेवेळी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांकडून प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाकडून विविध ठिकाणी देण्यात येणारी व्याख्याने व प्रात्यक्षिके याचा मोठा फायदा तर झालाच पण आगीविषयक सुरक्षा व उपाययोजना याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे आज अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन प्राथमिक स्वरुपात आगीवर नियंत्रण मिळवता आले अशी भावना व्यक्त करीत अग्निशमन दलाचे आभार मानले.
या कामगिरीत प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर, वाहनचालक अतुल मोहिते व फायरमन चंद्रकांत गावडे, आजीम शेख, सागर ठोंबरे, मयुर ठुबे, तुषार जानकर यांनी सहभाग घेतला.