फोटो सौजन्य - Social Media
मालेगाव तालुक्यातील विश्वविख्यात शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा बंद पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. देशभरातून हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, कॅमेरे बंद असताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
‘जैनांची काशी’ म्हणून ओळख असलेल्या शिरपूर नगरीत जैन धर्मियांचे २३ वे तीर्थंकर भगवान श्री पार्श्वनाथ यांचे हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. कोणत्याही आधाराशिवाय उभी असलेली मुख्य मूर्ती असल्यामुळे हे मंदिर ‘अंतरिक्ष पार्श्वनाथ’ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, मंदिराच्या कारभारावरून झालेल्या आपसी वादामुळे सन १९८१ ते २०२३ या तब्बल ४२ वर्षांच्या कालावधीत हे मंदिर बंद होते.
सर्वोच्च न्यायालयाने २२ फेब्रुवारी २०२३ आणि ४ एप्रिल २०२३ रोजी दिलेल्या आदेशानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले झाले. त्यानंतर दर्शन व पूजनासाठी दररोज हजारो भाविक मंदिरात येऊ लागले असून, दिवसेंदिवस गर्दीत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
मात्र, क्षेत्रपाल देवाच्या भुयारातील काही कॅमेरे विघ्नसंतुष्ट व्यक्तींनी फोडल्याची घटना यापूर्वी घडली होती. त्या घटनेनंतर कॅमेरे पुन्हा दुरुस्त करून सुरू करण्यात आले. असे असतानाही पुन्हा एकदा मुख्य सीसीटीव्ही प्रणाली बंद पाडण्यात आल्याने सध्या संपूर्ण मंदिर परिसर कॅमेरा निगराणीशिवाय असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात शिरपूर जैन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक केशव वाघ यांनी सांगितले की, मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. यात्रेकरू, भाविक आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी मंदिराच्या आत सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे.
दरम्यान, अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानचे व्यवस्थापक बाबुराव बोराटे यांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच मंदिराचा कारभार सुरू असताना काही विघ्नसंतुष्ट मंडळी गुंडगिरी करून उपद्व्याप माजवत असल्याचा आरोप त्यांनी केला. यात्रेकरू आणि दर्शनार्थींची सुरक्षा राखणे हे व्यवस्थापनाचे प्रथम कर्तव्य असून, त्यासाठी बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे वारंवार बंद पाडले जात असल्याने मंदिरातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, याप्रकरणी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. मंदिर परिसरात घडणाऱ्या अशा घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.






